[1] बंधूनो आत्मिक दानांविषयी, तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.
[2] जेव्हा तुम्ही परराष्ट्रीय होता, तेव्हा जसे चालवले जात होता तसे तुम्ही या मुक्या मूर्तींकडे नेले जात होता. हे तुम्हास ठाऊक आहे.
[3] म्हणून मी तुम्हास सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभू आहे,” असे म्हणू शकत नाही.
[4] आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे.
[5] तसेच सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.
[6] आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत पण सर्वात सर्व कार्ये करणारा तो देव एकच आहे.
[7] पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे.
[8] कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.
[9] दुसर्याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने,
[10] आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे.
[11] पण या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो.
[12] कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे.
[13] कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच पवित्र आत्म्याने भरण्यात आले.
[14] कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे.
[15] जर पाय म्हणेल, ‘मी हात नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही.
[16] आणि कान म्हणेल, ‘मी डोळा नाही म्हणून शरीराचा नाही’, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे नाही.
[17] सर्व शरीर डोळा असते तर ऐकणे कुठे असते? आणि सर्व ऐकणे असते तर वास घेणे कुठे असते?
[18] पण, शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे लावून ठेवला आहे.
[19] ते सगळे मिळून एक अवयव असते, तर शरीर कुठे असते?
[20] पण, आता पुष्कळ अवयव आहेत तरी एक शरीर असे आहेत,
[21] आणि डोळा हाताला म्हणू शकणार नाही की, ‘मला तुझी गरज नाही’, तसेच डोके पायांना म्हणू शकणार नाही की, ‘मला तुमची गरज नाही.’
[22] तर उलट, शरीराचे जे अवयव अधिक अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत.
[23] आणि शरीराचे जे भाग आपण कमी मानाचे मानतो त्यांना पुष्कळ अधिक मानाचे आवरण घालतो आणि आपल्या कुरूप भागांना पुष्कळ अधिक रूप लाभते.
[24] कारण आपल्या शोभून दिसणार्या अवयवांना गरज नाही पण ज्या भागांना गरज आहे त्यांना पुष्कळ अधिक मान देऊन देवाने शरीर जुळवले आहे.
[25] म्हणजे शरीरात कोणेतेही मतभेद नसावे तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.
[26] आणि एक अवयव दुखत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुख सोसतात आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात.
[27] आता, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात.
[28] आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहाय्यक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारे असे नेमले आहेत.
[29] सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच चमत्कार करणारे आहेत काय?
[30] सगळ्यांनाच रोग काढण्याची कृपादाने मिळालीत काय? सगळेच अन्य भाषा बोलतात काय? सगळेच अर्थ सांगतात काय?
[31] पण तुम्ही अधिक मोठी कृपादाने मिळवण्याची इच्छा बाळगा आणि शिवाय, मी तुम्हास एक अधिक चांगला मार्ग दाखवतो.