
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 21st April 2026
भक्त देवप्रेम घेतो। देवासी ते सर्व अर्पितो । देवाचा आनंद पाहूनी परमानंद घेतो । आनंदासी घेतो , प्रेमे आनंदासी घेतो ॥
सत्संगतीतील संगीत. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झालेला शनिवारचा कार्यक्रम म्हणजे सुश्राव्य संगीताची अनोखी मैफील होती. सर्व उपस्थित प्रेमीजनांशी जवळीक साधून स्थानापन्न झाल्यापासूनच प्रभूंच्या अंतरंगातील सूर घुमू लागले होते. मन आत्मरंगी रंगीले , रामरंगी रंगीले . प्रभूंचे आत्मगायन जणू सप्तसुरांची लोभसवाणी बंदिश होती. कार्यक्रम रंगत चालला होता आणि तशातच प्रभूंनी सत्यविजय रेवाळेंना पदगायन करायला सांगितले.
'देवकार्य घडे प्रेमाने । देवप्रेम वाढे ( वाहे ) वेगाने ।'
गोड व सुमधूर चालीतील या पदगायनाने प्रभू प्रसन्न झाले व प्रेमीजन आनंदित . त्याच भारावलेल्या वातावरणात प्रभूंनी माईक विदुलापुढे सरकवला आणि भावपूर्ण गायकीचा एक आगळावेगळा आविष्कार प्रकट झाला. '
'जसा भाव ज्याचा तसा देव त्याचा'
विदुलाच्या भावाच्या प्रभूंचे दर्शन प्रेमीजनांना झाले. प्रभूंचा प्रतिसाद केवळ कौतुकाचा नव्हता तर ज्या भावातून व अनुभवातून प्रभूंना ते पद स्फुरले होते त्या अष्टसात्विक अनुभवाचे ते प्रकटीकरण होते.
आता पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना असतानाच प्रभूंनी एकतारी हातात घेतली. मंगल तारी व प्रकाश तारी गेली कित्येक वर्षे प्रभूंशी स्वतंत्रपणे जोडली गेली आहेत. या प्रवासात त्यांच्या लौकिक जीवनातल्या भूमिका बदलत गेल्या तरीही उभयतांची प्रभूंविषयी व्यक्तिगत श्रध्दा व निष्ठा अबाधित राहिली होती उभयतांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भाव प्रकट करण्यास , त्यांना बोलते करण्यास प्रभू प्रेरित करत होते. खरं तर या संवादाच्या माध्यमातून प्रभंची एकूणच निष्ठावंत भक्तांविषयी असलेली आत्मियता व स्नेहभावाची जाणीव
प्रेमीजनांना होत होती. संवाद संपता संपता सभागृहातील मंत्रमुग्ध वातावरणात प्रभूंनी भगवंताशी नाते जोडणारी एकतारी छेडण्यास सुरुवात केली .
'राम कृष्ण कृष्ण हरी मंगल नाम एकतारी'
देव नि भक्त काय हे नाते तेचि फक्त जाणती ते.
दैवी संगीताचा तो एक अविस्मरणीय आविष्कार होता . सर्वांचेच देहभान हरपले होते.
पुढे काय झाले ? ते पुढील अध्यायात .
आनंदासी घेतो प्रेमे ... .
श्रीपरमानंदस्वामीर्पणमस्तु.