
Guru Shishya Sukhanandsamwad as on 13th February 2026
कौतुक करूनिया प्रेमे मज सुखविले। प्रेम कैसे द्यावे घ्यावे मज तूचि दाखविले। ते प्रेम तुजसी देता तुज येई प्रेमभरते। देवा तुझे नि माझे जुळले हे प्रेमनाते ॥ कार्याच्या रूपाने प्रभूंचा खेळ चालूच होता. कधी सामूहिक तर कधी व्यक्तिगत. गुरुवारी निरूपण तर मंगळवारी व्यक्तिगत भेट. या व्यक्तिगत भेटीचे मला नेहमीच अप्रूप असे. प्रभूंशी आमने सामने संवाद होत असे. मला दर मंगळवारी बोलायला मिळावे अशी माझी इच्छा असायची. आणि प्रभू माझे लाड खूप पुरवायचे. पण प्रभूंना सर्वांना सामावून घ्यायचे आहे याचे भानही मला असायचे . कधी कधी कुणाच्या मनातील कधी उत्साहाची तर कधी नैराश्याची भावना जाणून प्रभू त्या व्यक्तीला बोलके करायचे . पण प्रभू कुणाशीही सापेक्षतेने प्रकट होत असले तरी त्यावेळी त्या व्यक्तिगत संदर्भातील तो विशिष्ट प्रसंग बाजूला पडून माझ्या मनातील प्रभू त्या प्रसंगाच्या पलीकडे असलेल्या निरपेक्ष व मूलभूत तत्वांकडे
माझ्या मनाला निर्देश करत आहेत हे मला जाणवायचे . इतरांशी झालेल्या संवादातूनही माझ्या मनाचे पालनपोषण व संगोपन अशा प्रकारे घडत होते. मनाची जोपासना होत होती. मन घडत होते. आम्ही बि घडलो तुम्ही बि घडाना. गुरुवारी निर्गुण असलेले प्रभू मंगळवारी आमच्या भाग्याने सगुण साकार होत असत . म्हणूनच मंगळवारच्या नियमित भेट अमूल्य होती . भक्तिमार्गाकडे वळण्याकरता अप्रत्यक्षपणे प्रेरित करत होती. देवा तुझे नि माझे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु