Episode 479 as on 6th February 2026
06 February 2026

Episode 479 as on 6th February 2026

Guru Shishya Sukhsamwad

About

Guru Shishya Sukhanandsamwad as on 6th February 2026


भक्ता एक देवगोडी। सारखी त्यांची प्रेमआवडी। परमानंदे देवासारखा गोड होऊनी राहतसे। देवा तुझे प्रेम कसे ॥ प्रभूंनी जवळीक देऊ केली होती. संवाद होत होता. प्रभूंशी बोलताना एक त्यांची एक खूबी आजही जाणवत आहे . कुठलाही विषय त्यांना वर्ज्य

नाही. पण बाह्यांगाने प्रकट होत असताना त्यांच्या अंतरंगात एक निश्चित असे आध्यात्मिक सूत्र असते . दृष्टांत सर्वसाधारण जीवनविषयक असतात पण निर्देश त्यांच्या ठायी विसावलेल्या त्यांच्या रामाच्या अधिष्ठानाकडे

असतो. सुरवातीला हे लक्षात येत नसे पण जसजशी जवळीक वाढत गेली तसतसा त्यांच्या वचनांमधला मूलार्थ उलगडत व उमजत गेला. रामदासस्वामींचे मनाचे श्लोक, मनोविजय ग्रंथामधील श्रीअवधूतस्वामींचे त्या श्लोकांवरील भाष्य व प्रभूंची उल्हसित करणारी वचने या त्रिसूत्रीने माझी जीवनाकडे पहाण्याची दृष्टी बदलत गेली. प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे. मी सुध्दा त्या ईश्वराचाच अंश आहे. देहाच्या अभिमानामुळे व अहंकारामुळे माझ्यातील ईश्वराचा अंश झाकोळला गेला आहे. 'जुने ठेवणे मीपणे आकळेना.' माझे मीपण सहजासहजी जाण्यासारखे नाही. या साठी प्रभूंशी अधिकाधिक जवळीक साधायला हवी. संसारभाव कमी होत होता पण भक्तिभाव वाढायला हवा हा विचार पक्का होत गेला . जीवन एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचले होते. 'जुने ठेवणे मीपणे आकळेना' या अवस्थेतून बाहेर पडण्याची वेळ येऊन ठेपली होती. परमानंद देवासारखा गोड होऊन राहिला होता. त्या गोडीमध्ये मीपण हळुहळु विरघळण्याची शक्यता होती नव्हे तशी खात्रीच होती . देवा तुझे प्रेम कसे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.