
Guru Shishya Sukhanandsamwad as on 30th Jan 2026
प्रेम गोड तुझे खरोखरी। करिसी सारखे मजवरी। त्या प्रेमाची गोडी म्हणूनी थोडी थोडी कळतसे ॥ एकदा मनाच्या अडचणींवर मात करण्याचे बळ प्राप्त झाल्यावर प्रभूंशी बाह्यांगाने व मनाने संपर्कात व सहवासात सातत्य राखणे सुलभ व सुगम होत गेले. दरम्यान प्रभूंनी 'हा राम माझा' हा ग्रंथ भक्तांना सुपूर्द केला होता . नावावरूनच या ग्रंथाचे आगळवेगळपण स्पष्ट होत होते. हे काही त्रेतायुगातल्या रामाचे चरित्र नव्हते. महाराजांच्या प्रेमसंबंधातून त्यांच्या अंतःकरणात आत्मारामाची भेट झाली होती . 'हा राम माझा' हा ग्रंथ त्या भेटीच्या आत्मानुभवाचा आविष्कार होता . या ग्रंथात रामाच्या अंतःकरणाला प्रमाण मानून नारद लक्ष्मी सुखसंवादातून कथित रामचरित्रातल्या घटनांचे व प्रसंगाचे मार्मिक व मनाला पटणारे व भिडणारे व प्रसंगी प्रचलित समज गैरसमजांना छेद देणारे विवेचन केले आहे. परंतु त्याहीपेक्षा मला भावली ती नारदाची व्यक्तिरेखा. ग्रंथाचे पारायण करत असताना मला प्रभूंच्या विविध रूपांपैकी नारदाच्या रूपाचे आकर्षण वाटायला लागले . प्रभूंना नारदाच्या भूमिकेत पहात असताना मी लक्ष्मीच्या भूमिकेत शिरत होतो व लक्ष्मीच्या भावातून प्रभूंच्या कृपेने नारद व नारायण यांचे प्रेमसंबंध जाणून घ्यायची इच्छा मनात निर्माण झाली होती.
देवा तुझे प्रेम कसे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.